Tuesday 12 November 2013

दोन मुंग्या
 


 
आलं घालून मस्त पैकी उकळवलेला दुपारचा चहा पीता पीता समोरच्या भिंतीवर लक्ष गेले. दोन मुंग्या , एक अंगाने स्थूल आणि तर  दुसरी एकदम नाजूक, हातात हात घालून त्या  भल्या मोठ्या  भिंतीवर तुरुतुरु चालल्या होत्या. जणू काही अगदी पार छता पर्यंत जावून पोहचण्याचा त्यांचा इरादा असावा असे भासले. काय ठरवून त्या वर चढत होत्या ह्याची देवालासुद्धा कल्पना नसावी. जोडी जोडी ने चालण्याच्या त्यांच्या त्या बेमालून लकबी कडे पाहिल्यावर मला वाटले कि दोन जीवनसाथीच मनात कुठलीतरी आशा ठेवून चढत आहेत. खरंच आयुष्यात सर्व प्रकारच्या वळणावर कुणीतरी साथीदार बरोबर असल्यावर रणरणत्या  उन्हात सुद्धा गोड, स्वच्छ, मृदुल, थंड चांदण्याचा भास होतो आणि असे वाटते कि हा प्रवास कधी संपूच नये. 
 
बराच वेळ दोन्ही मुंग्या जोडीने चालल्या होत्या. जवळ जवळ अर्धी भिंत त्यांनी पार केली होती. तुरुतुरु चालत जोडीने घालविलेल्या त्या क्षणाची  आठवण त्यांना लक्षात राहील काय, ह्या प्रश्नांचे उत्तर मी शोधत होते. मनात कुठेतरी स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अशा प्रकारे एकत्र  घालविलेल्या बऱ्याच सुखद आणि थोड्याश्या दुखःद  आठवणीत मन रंगून गेले  होते. परत जेंव्हा भिंतीवर लक्ष गेले तेंव्हा माझ्या हृदयाचा एक ठोकाच चुकल्या सारखे वाटले. जोडी जोडीने इतका वेळ एकत्र क्रमण  करणाऱ्या त्या मुंग्या आता एकमेकांपासून अलग झाल्या होत्या. स्थूल शरीराच्या मुंगीला मागे सोडून दुसरी नाजूक आणि चपळ मुंगी पुढे निघून गेली होती. असे  वाटले कि ह्या दोन मुंग्या जोडीदार नसाव्यात. बहुतेक पालक आणि तिचे अपत्य असावे. वय झाल्यावर स्थूल झालेल्या त्या मुंगीला स्वतःच्या उमेदीच्या वयात असलेल्या लेकरूच्या बरोबर चालण्याचे उसने बळ आणण्यास बहुतेक कष्ट होत असावेत. वयोमाना प्रमाणे पालकाच्या  मंदावलेल्या चालीची  अभ्रकाला जाणीव कदाचित जाणीव नसावी. पण  ह्याचा अर्थ असा नव्हें कि त्याने मागे वळून  आपल्या  पालका कडे कधी पाहूच नये. ती जाड मुंगी भरभर चालण्याचा प्रामाणिक पणे  प्रयत्न करत होती. पोटच्या गोळ्याबरोबर पावलावर पावूल टाकून मार्ग क्रमण करण्यास ती आतुर होती  आणि जीवापाड प्रयन्त ही  करीत असावी. शरीर साथ देत नसतांना सुद्धा वेड्या आशेवर पुढे पुढे जायच्या ऐवजी ती मागेच जास्त रहात होती. तिची  असहाय्य  स्थिती आणि धडपड पाहून डोळे पाणावले आणि जीवनातल्या ह्या घोर आणि क्रूर सत्याची  नकळत जाणीव झाली. ह्याच वेळेत, भर योव्वनात असलेली  ती दुसरी मुंगी जीवनाचा आनंद लुटत खूप  दूर निघून गेली होती. ना तिला वेळेच भान ना तिला स्वतःच्या पालकाची आठवण !!! आपण पण एक दिवस असेच असहाय्य स्थितीला पोहोचणार आहोत ह्याची तिला जर सुद्धा कल्पना नसावी. जाणीव जर असती तर तिने एकदा तरी मागे वळून नक्कीच पाहिले असते, नाही का? दुसरीकडे वयस्कर मुंगीच्या नशिबाने वेगळीच पलटी मारली होती. बरेच  श्रमिक प्रयन्त करून सुद्धा तिच्या पदरी अपयशच आले होते. दैवाने तिला साथ दिली नव्हती. मनात असलेल्या उमंगाना न जुमानता तिच्या पावलांनी माघार घेतली होती. भिंतीवरून कोसळून ती थेट जमिनीवर पडली होती. परत भिंतीवरचा मार्ग सामोरा घालून चालत जाण्या इतकी तिच्यात शक्ती नसावी. बराच वेळ ती तशीच निपचित होवून जमिनीवर पडली होती. तिच्या त्या दैन्यवाणी स्थितीची आणखीन थोडा वेळ निरीक्षण करत उभे राहण्याचे धैर्य माझ्यात नव्हते.मनाला झालेल्या वेदनांना लपवत तिच्या नकळत मी तेथून हळूच पाय काढता घेतला. जीवनाच्या ह्या अघोर सत्याला कोण टाळू शकेल काय ? का मग आपण उगीचच खोटी आशा उराला कवटाळून बसलेलो असतो ? ह्या जगात कुणी कुणाच नाही , हे माहित असतांना सुद्धा का आपण खोटी नाती-गोती सांभाळण्याचा खटाटोप करत असतो? ह्या प्रश्नांचे उत्तर माहित असतांना सुद्धा का ह्या जाळ्यात सर्वजण आपणहून  अडकतात ? हे सर्वकाही भगवंताच्या इच्छेनुसार होत असते का ?
 
नेहमीप्रमाणे मन अशा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात असतांना लक्षात आले की ती स्थूल देहाची मुंगी हळूच उठून हेलकावे खात खात पुन्हा एकदा आशेच्या जोरावर चालू लागली होती. देईल  का कुणी साथ तिला, तिच्या उरलेल्या मार्गक्रमणावर ?