Sunday 23 June 2013

एक जोक … कि एक भेसूर सत्य !!!
 


घराजवळच असलेले "सुख-सागर" उपाहारगृह  हे आम्हा दोघांचेही आवडीचे !! शुद्ध शाकाहारी आहे म्हणून नव्हे तर पांचच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून !! वाढत्या वयोमानाप्रमाणे हल्ली भूकही बरीच कमी झाली आहे. खाण्यासाठी न जगता , जगण्यासाठी खायचे दिवस एव्हडे लवकर आमच्या जीवनात येतील याची आम्हाला तसुमात्र कल्पना नव्हती. परंतु जे झाले ते बऱ्या साठीच झाले म्हणले पहिजे. नाहीतर ह्या दुबई मध्ये बारीक आकाराची बायको ढब्बू आणि गोलाकार व्हायला एक महिन्याची पण उसंत लागत नाही .

तर अशा या सुख सागरात आम्ही काल  मजेत डुबकी मारायला गेलो होतो. थोड्याच वेळात आमच्या शेजारच्या टेबलावर एक सुंदरसा दोन हृदयं एकमेकांना चिकटून असलेला गुलाबी रंगाचा केक आणून ठेवला. तो केक बघून आमच्या मनात उगीचच गुदगुदल्या झाल्या. मी माझ्या साथीला म्हंटल ," कोणाची wedding anniversary आहे वाटते. मोठ्ठी पार्टी फेकणार असे दिसतेय ". जवळजवळ दहा - पंधरा मिनिटे तो केक तसाच उघड्यावर पडला होता . त्याच्यावर माशी किंवा झुरळ बसेल कि काय अशी मला भीती वाटत होती . मी अगदी एक चित्ताने त्याच्या वर नजर खिळवून बसले होते. अचानक वेटरनी तो केक परत डब्ब्यात भरला आणि एका माणसाच्या हातात कोंबला. हे सर्व इतके भरभर घडले कि आम्ही  दोघेही तोंड आssss करून बघत बसलो.

मी माझ्या पतीदेवाला म्हंटले,"बहुतेक त्यांचा ग्रुप मोठा असावा आणि त्यांची इथे बसायची व्यवस्था बरोबर झाली नसेल. ते दुसरी कडे कुठे तरी गेले असतील." ह्यावर माझ्या हजरजवाबी नवऱ्याने काढलेले उद्गार अगदी कौतुक करण्यासारखे आहेत. ते म्हणाले ," नाही तसे काही झाले नसेल. मला वाटते, केक कापण्याच्या अगोदरच त्या दोघांचा घटस्फोट  झाला असण्याची जास्त शक्यता आहे. हल्ली नाती बनवायला आणि मोडायला पाच मिनिटे सुद्धा लागत नाहीत. काळाच्या ओघात सगळेच बदलत आहे." त्यांचे हे  विश्लेषण ऐकून मन सूंद झाले.

खरंच, किती भेसूर सत्य त्या वाक्यात लपलेले होते. नाती जपण्यात जी एकप्रकारची मनाची मृदुलता , सहिष्णुता,  अध्वरता लागते ती हल्ली कुठे हरवून गेली आहे कोणास ठावूक ? प्रत्येक जण आपलेच खरे आणि श्रेष्ठ म्हणतो . Compatibilityच्या नावाखाली अगदी मनाला येईल तसे वागण्याचा प्रयन्त हल्लीची पिढी करत आहे. "मी आणि माझे" ह्या पलीकडे कोणाला काही दिसेनासेच झाले आहे. अशा ह्या जगात भगवंताच्या अनुसंधानात राहुन परमार्थ करण्याची रीत तर आता स्वप्नात सुद्धा जमणार नाही. कुठले प्रेम, कुठली आपुलकी, कुठला दिलासा, कोण कुणाचा …संपूर्ण घडीच बिघडली आहे. हातात काठी धरून जीवन समाधानाने जगू म्हणणाऱ्याच्या नशिबात आता हात पण परका झाला आहे आणि काठीचा तर कुठे सुगावाच लागत नाही आहे…. काय हा परकेपणा !!!!     

Monday 3 June 2013

सत्संगती 


श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||
न लगे जावया | कुठे पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||
व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||
अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||
लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांत मिळून मिसळून राहणे. श्रेष्ठ लोकांच्या सहवासात असणार्‍या व्यक्तीमध्ये चांगले गुण येतात व ते विकसित होतात. आपल्यापेक्षा अधिक योग्य, गुणी, बुद्धिमान विद्वानांच्या सहवासाला सत्संगती म्हणतात.याउलट अयोग्य, गुणहीन,मूर्ख व्यक्तीचा सहवास म्हणजेच कुसंगती होय. सभोवतालच्या वातावरणातून मनुष्य बरेच काही शिकतो. जर त्याला चांगली संगत मिळाली तर त्याचा निरंतर विकास होत राहतो. विनोभा भावे म्हणतात, 

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥

अशीच सत्संगती मला, देवाच्या कृपेने, गेले ५ वर्षे अगदी सतत आणि प्रकर्षाने मिळाली आहे. जीवनाच्या साथीदाराबरोबर अगदी मनापसून उत्तेजित होवून, उल्हासाने, स्थिरतेने, समाधानाने, आनंदाने घालविलेली ही ५ वर्षे माझ्या नशिबात आली आणि मी ती पूर्णपणे चोखंदळू शकले, हे देवाच्या कृपेशिवाय आणि थोरामोठ्यांच्या  आशीर्वादाशिवाय कसे साध्य होईल ? दररोज किमान एक तास तरी काहीतरी चांगले  वाचण्याचा परिपाठ आम्ही एकत्र गेली पाच वर्षे करत आहोत. पुढे पण हा परिपाठ चालू ठेवण्यास देव आम्हाला समतोल बुद्धी देवो, अशी देवाकडे प्रार्थना !!!

दररोज संध्याकाळी, "THE HOLY GEETA" by स्वामी चिन्मयानंद , श्री. प्र. ह. कुलकर्णी यांचे  "मनोबोधामृत" , साने गुरुजींचे "श्यामची आई ", श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची "प्रवचने" ह्या अशा सुलभ सुंदर, सहज आकलन होण्याऱ्या दिव्य पुस्तकांचे वाचन आणि सोबतीला माझ्याशी एकरस होवून वाचलेले ऐकणारा आणि ऐकाविणारा असा माझा थोर साथीदार …… सत्संगतीचा अर्थ ह्याशिवाय वेगळा काय बरे असू शकेल? 

Saturday 1 June 2013

काय बरोबर आहे ना ?…. !!!


फेसबुकवर वाचलेल्या ह्या पोस्टचे कौतुक करावे तेव्हढे कमी !!! परंतु आपली गत "कळते पण वळत नाहीं " अशातली आहे. आपण कधी सुधारणार, ह्याची हल्लीच्या तरुणांना थोडी तरी चिंता आहे काय, ह्याबद्दल फक्त देवालाच ठावूक !! पण गड्यानो , एक लक्षात ठेवा, "भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही हैं " मग काय देवाकडून लाठीचा मार पडायच्या अगोदर सुधारणार ना ? नाही तर तुम्ही आणि तुमचे फुटके नशीब …!! 


थोडे प्रदीर्घ.... पण फार महत्वाचे
********************

प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा आणि आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी.....:

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

-  उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
-  ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
-  तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या     
   बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
  जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली 
  असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या 
  रितीभाती स्वीकारायला आली असेल.
- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, 
  अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी 
  अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,
- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच 
   तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या 
  तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला 
  माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या,        अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही  दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही 
  म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

काय बरोबर आहे ना ?…. !!! पटलं असेल तर चला पटापट कामाला लागा पाहू !!!!