Wednesday 14 May 2014

चिमुकली लेक

चिमुकली लेक

श्री.गजानन महाराजांचे चरित्र वाचून झाल्यावर रात्री सुखासमाधानाने झोप लागली नसती तरच जरा विचित्र वाटले असते. संत , महापुरुष ह्यांच्या चरित्रात अशी काय जादू असते कुणास ठावूक कि ते वाचून झाल्यावर मन अगदी शांत आणि निश्चिंत होवून जाते . आई  वडिलांना त्यांच्या स्वतःच्या प्राणापलीकडे सुद्धा  प्रिय असलेल्या त्या गर्भातल्या चिमुकल्या जीवाला सुद्धा ह्या सुखासमाधानाचा मागोवा नक्किच लागला असावा. म्हणूनच अगदी लगबगीने बाहेरच्या  सुंदर दुनियेचा स्वाद घेण्यासाठी त्या जीवाने दुसऱ्याच दिवशी सकाळच्या कोवळ्या प्रहरी आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात प्रवेश केला. अगदी पहिल्या क्षणापासून ह्या बाळाने जे सुंदर हास्य द्यायला सुरवात केली ते  अजूनही असेच सुंदर , मोहक , खळखळून हसत आहे . तिचे हे मनाला वेड करून टाकणारे हास्य असेच कायम राहू देत हीच देवाकडे प्रार्थना !!

बालपणी नानाप्रकारच्या बालक्रीडा करून पालकांच्या
आणि आजूबाजूंच्या लोकांच्या मनात घर करून राहणारी हि लेक स्वभावाने थोडीशी हट्टी आहे. परंतु मुळाशी मनाने गोड हळवी असल्याने तिचा हट्टीपणा सुद्धा हवाहवासा वाटणारा आहे. नेहमी हसतखेळत असणाऱ्या ह्या लेकीने घराचं जणूकाही नंदनवन बनवून टाकले होते. शाळेत अभ्यासात एकदम उत्तम गुण  मिळवणारी , भाषण-नृत्य- खेळ अशा अनेक गोष्टीत भरपूर बक्षिशे मिळवणारी, कॉलेजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येवून चांदीचे पदक घेवून घराण्याचे नाव उज्ज्वल करणारी, ऑफिसमध्ये 'Best employee ' म्हणून सत्कार करून घेणारी, घरी कुठल्याही प्रकारच्या कामाला सदैव तयार असणारी, स्वताच्या कर्तुत्वाने मुलानासुद्धा लाजवणारी ....अशी ही चिमुकली पोर कधी लग्नाच्या बोहल्यावर उभी राहिली हे कळलेच नाही. लग्नातला तिचा सतत हसतमुख असलेला चेहरा किती वेळा डोळ्यासमोर आणला तरी मनाचे समाधान होत नाही. स्वताच्या पसंतीचा जीवनसाथी निवडून,लग्नानंतर एकाच गावात राहणार असल्यामुळे विदायीच्या वेळी आईच्या डोळ्यात अश्रू न येणे ह्यात चुकीचे असे काहीच नव्हते. ह्याच्या उलट, संस्काराने आमच्यापेक्षा वरचढ असलेल्या कुटुंबात ती जात होती म्हणून मनाला हायसे वाटले होते. माहेरच्या लोकांची तिला उणीव अजिबात भासणार नाही ह्याची अगदी खात्री होती. एका  मायेने    ह्याच्यापेक्षा आणखीन काय बरे देवाकडे मागितले असते?

लेक सासरी सुखाने नांदत आहे ह्या सुखाच्या विश्वात मन असे काही रंगून गेले होते कि लेकीच्या कुंडलीत परदेशी स्थलांतराचा  योग येणार आहे ह्याचा काही काळ का  होईना विसर पडून गेला होता. थोड्याच दिवसात हि पोर दूरच्या देशात स्वताची स्वप्ने साकार करण्यासाठी उमेदीच्या पंखावर  बसून आमच्यापासून अलग होणार ह्याची जाणीव झाली आणि डोळे पाणावले. लग्नमंडपात न आलेल्या हुंद्क्याने अचानक स्वताच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. लेकीच्या विरहाच्या कल्पनेने मन व्याकूळ झाले. कडक शिस्तीच्या नावाखाली,  तिच्या बालपणात तिच्या चिमुकल्या गोंडस  कोमल हाताच्या  तळव्यावर गरम चमच्याने दिलेला चटका आणि स्पर्धेत गाणे न म्हणता गुपचूप उभी राहिली म्हणून खोलीत हाताची घडी करून चार तास कोपऱ्यात उभे राहण्याची दिलेली शिक्षा ... ह्या अपराधांच्या बोज्याखाली तिचीl माय आजही दबून गेली आहे. काय प्रायच्शित्त करावे म्हणजे ह्याची खंत मनातून कायमची विलोप होवून जाईल? वयाची २८ वर्षे झाली तरी स्वताच बालमन जसच्या तसं जपून ठेवलेली हि लेक तिच्या आईला कधी तरी प्रेमाच्या खातीर क्षमा करेल ना ?

Sunday 4 May 2014

संकोच

संकोच

नववधू लेकीच्या घरात तिचे सासूसासरे सहा महिन्यासाठी अमेरिकेला त्यांच्या लेकीकडे राहावयास जाणार आहेत. लेकीला सुचवले कि , "तुम्ही दोघेच एकटे राहण्यापेक्षा माहेरी येवून राहिलात तर बरे होईल ." लेकीने झटकन उत्तर दिले . म्हणाली ,"नको . आम्ही आमच्याच घरात राहू . माझ्या नवऱ्याला माझ्या माहेरी येवून राहावयास संकोच वाटतो . " तिचे हे समझदार पणाचे उत्तर ऐकून एकीकडे बरे वाटले तर दुसरीकडे मनात विचार आला ...लेक विवाह करून अगदी अपरिचित ,अनोळख्या घरी फक्त एका व्यक्तीवर प्रेमपूर्वक विश्वास ठेवून पदार्पण करते आणि अगदी दुसऱ्या क्षणापासूनच कुठल्याही प्रकारचा संकोच न करता त्या घरातील प्रत्येक माणसाला , प्रत्येक वस्तूला ,त्या घराला आपलेसे मानून प्रेम करायला सुरवात करते. तिला कसा नाही संकोच वाटत नवीन घरी? कुठल्या गोष्टीवर एव्हढा खात्रीपूर्वक विश्वास ठेवून ती त्या नवीन वातावरणात रमून जाते आणि आपल्या पुढील आयुष्यातील स्वप्ने रंगवू लागते? चारच वर्षापूर्वी ' लग्न ' या शब्दाबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न आणि शंका असलेल्या माझ्या लेकीने स्वतःच्या संसाराची सुरवात मुलायम प्रेमाने सुरु केलेला पाहून मनाला बरे वाटले आणि देवाचे मनापासून आभार मानले.

Wednesday 30 April 2014

भोळेपणा कि भोळसटपणा

भोळेपणा कि भोळसटपणा

स्थळ : महाराजा भोग उपहारगृह
वेळ : रात्री ९ वाजता
मेनू : राजस्थानी शाकाहारी थाळी

कचकचुन लागलेली भूक, समोर बसलेली सुंदर हसमुख अशी व्यक्ती - माझा नवरा , ताटात असलेल्या अनेक वाट्या कडे पाहत असतांना लक्षात आले कि समोरच्या टेबलावर बसलेला १०-१२ वर्षाचा मुलगा हात जोडून  डोळे  मिटुन मंत्र म्हणत होता. चकित होवून त्याचाकडे पाहत असतांना त्याच्या पालकांचे कौतुक करावसे वाटले. मनात शंकेची पाल चुकचुकली ..... हा मुलगा पुढे मोठा झाल्यानंतर असाच राहील का ? खरच , लहानपणी रुजू घातलेले संस्कार तसेच राहत का नाहीत? तारुण्यावस्थेत असे काय होते कि माणसात एकदम बदल घडून येतो आणि बालपणातील कोवळे आणि निरागस मन अचानक नकळत हरवून बसतो ?