Thursday 14 March 2013


♥ सात फेरे ♥

आमच्या लग्नात (माझे वय २४ आणि पतिदेवाचे २९) सर्वांच्या प्रमाणे आम्ही पण सात फेरे घातले होते. हे फेरे का घेतले  जातात ह्याची मला त्या वेळी फारशी कल्पना नव्हति. आजही ह्या क्षणाला मला आठवतो तो फक्त एक मऊ , मुलायम, भोला-भाबडा , स्नेहपूर्वक , आनंदित …असा  स्पर्श !!! एका हाताने दुसऱ्या हाताला दिलेला भरवसा, माझ्या बरोबर अशीच/असाच  कायमची /चा राहा म्हणून नकळत करून घेतलेली खात्री , आदर्शवादी झालो नाही तरी सर्व सामान्य लोकांप्रमाणे आशावादी जीवन आपणपण जगूया ह्याबद्दल एकमेकांना हळूच दिलेला दिलासा …. अशा सर्व भावनांचा त्या वेळी मनात  झालेला कल्लोळ , आज अजूनही ताजातवाना आहे. अजूनसुद्धा आम्ही जेंव्हा हातात हात घेवून फिरावयास जातो तेंव्हा प्रत्येक वेळी ''सात फेरे" घेत आहोत असेच वाटते. तोच स्पर्श, त्याच भावना, तोच भरवसा, तीच खात्री, आणि तोच दिलासा … मला वाटते , हा खरा ''सात फेऱ्यांचा " अर्थ असावा .  


पहिला फेरा :- जोडपं देवाकडे सुखी भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते. नवरा आयुष्यभर बायको व मुलाला सुखी ठेवण्याचे वचन देतो आणि बायको आयुष्यभर नवऱ्याची व नवऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे वचन देते. 

दुसरा फेरा :- नवरा आपल्या बायकोला त्याची ताकद बनण्याचे व आयुष्यातील सर्व संकटाना तोंड देण्यासाठी मागे उभे राहण्यासाठी विनंती करतो, हे मान्य करून बायको त्या बदल्यात अशाश्वत प्रेम व प्रामाणीकपणा मागते. 

तिसरा फेरा :- जोडपं, आरोग्य आयुष्यासाठी प्रार्थना करते व धार्मिक राहण्याचे वचन देते तसेच बायको आपल्या नवर्याला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे आश्वासन देते. 

चौथा फेरा :- आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता, सुख व मंगलदायकता आणल्या बद्दल नवरा बायकोचे आभार मानतो व बायको नवर्याला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवण्याचे वचन देते. तसेच दोघे मिळून दोघांच्या कुटुबांची काळजी घेण्याचे, आदर दाखविण्याचे व आनंदी ठेवण्याचे वचन देते. 

पाचवा फेरा :- नैसर्गिक गोष्टींचा आपल्याला लाभ मिळावा व आपल्या पोटी सुदृढ व गुणी बाळ जन्माला यावा ह्यासाठी जोडपं देवाची प्रार्थना करते. 

सहावा फेरा :- नेहमी बरोबर राहण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते, तसेच नवर्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये व धार्मिक विधींमध्ये त्याची अर्धांगिनी बनण्याचे वचन बायको कडून दिले जाते. 

सातवा फेरा :- सात जन्म हाच नवरा व हीच बायको मिळावी हि प्रार्थना केली जाते तसेच आयुष्यभर दोघे एकमेकांशी प्रामाणिक राहावे व आयुष्यामध्ये भरभराट यावी ह्या साठी सुधा प्रार्थना केली जाते. 


♥ जरी वेगवेगळ्या धर्माची रीत वेगळी असली तरी त्यातील विधींचा अर्थ हा एकाच आहे तो म्हणजे " एकबद्धता " ( Commitment ) , तसेच "तुझ्या प्रेमासाठी व साथीसाठी मी लायक आहे" हे खात्रीने व साक्षीने सांगण्याचा हा एक मार्ग आहे. ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment