Monday 3 June 2013

सत्संगती 


श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||
न लगे जावया | कुठे पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||
व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||
अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||
लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांत मिळून मिसळून राहणे. श्रेष्ठ लोकांच्या सहवासात असणार्‍या व्यक्तीमध्ये चांगले गुण येतात व ते विकसित होतात. आपल्यापेक्षा अधिक योग्य, गुणी, बुद्धिमान विद्वानांच्या सहवासाला सत्संगती म्हणतात.याउलट अयोग्य, गुणहीन,मूर्ख व्यक्तीचा सहवास म्हणजेच कुसंगती होय. सभोवतालच्या वातावरणातून मनुष्य बरेच काही शिकतो. जर त्याला चांगली संगत मिळाली तर त्याचा निरंतर विकास होत राहतो. विनोभा भावे म्हणतात, 

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो |
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥

अशीच सत्संगती मला, देवाच्या कृपेने, गेले ५ वर्षे अगदी सतत आणि प्रकर्षाने मिळाली आहे. जीवनाच्या साथीदाराबरोबर अगदी मनापसून उत्तेजित होवून, उल्हासाने, स्थिरतेने, समाधानाने, आनंदाने घालविलेली ही ५ वर्षे माझ्या नशिबात आली आणि मी ती पूर्णपणे चोखंदळू शकले, हे देवाच्या कृपेशिवाय आणि थोरामोठ्यांच्या  आशीर्वादाशिवाय कसे साध्य होईल ? दररोज किमान एक तास तरी काहीतरी चांगले  वाचण्याचा परिपाठ आम्ही एकत्र गेली पाच वर्षे करत आहोत. पुढे पण हा परिपाठ चालू ठेवण्यास देव आम्हाला समतोल बुद्धी देवो, अशी देवाकडे प्रार्थना !!!

दररोज संध्याकाळी, "THE HOLY GEETA" by स्वामी चिन्मयानंद , श्री. प्र. ह. कुलकर्णी यांचे  "मनोबोधामृत" , साने गुरुजींचे "श्यामची आई ", श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची "प्रवचने" ह्या अशा सुलभ सुंदर, सहज आकलन होण्याऱ्या दिव्य पुस्तकांचे वाचन आणि सोबतीला माझ्याशी एकरस होवून वाचलेले ऐकणारा आणि ऐकाविणारा असा माझा थोर साथीदार …… सत्संगतीचा अर्थ ह्याशिवाय वेगळा काय बरे असू शकेल? 

1 comment:

  1. रामकृष्ण हरी!
    हच खरा अध्यात्मिकतेचा गाभा आहे.

    ReplyDelete