Sunday 23 June 2013

एक जोक … कि एक भेसूर सत्य !!!
 


घराजवळच असलेले "सुख-सागर" उपाहारगृह  हे आम्हा दोघांचेही आवडीचे !! शुद्ध शाकाहारी आहे म्हणून नव्हे तर पांचच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणून !! वाढत्या वयोमानाप्रमाणे हल्ली भूकही बरीच कमी झाली आहे. खाण्यासाठी न जगता , जगण्यासाठी खायचे दिवस एव्हडे लवकर आमच्या जीवनात येतील याची आम्हाला तसुमात्र कल्पना नव्हती. परंतु जे झाले ते बऱ्या साठीच झाले म्हणले पहिजे. नाहीतर ह्या दुबई मध्ये बारीक आकाराची बायको ढब्बू आणि गोलाकार व्हायला एक महिन्याची पण उसंत लागत नाही .

तर अशा या सुख सागरात आम्ही काल  मजेत डुबकी मारायला गेलो होतो. थोड्याच वेळात आमच्या शेजारच्या टेबलावर एक सुंदरसा दोन हृदयं एकमेकांना चिकटून असलेला गुलाबी रंगाचा केक आणून ठेवला. तो केक बघून आमच्या मनात उगीचच गुदगुदल्या झाल्या. मी माझ्या साथीला म्हंटल ," कोणाची wedding anniversary आहे वाटते. मोठ्ठी पार्टी फेकणार असे दिसतेय ". जवळजवळ दहा - पंधरा मिनिटे तो केक तसाच उघड्यावर पडला होता . त्याच्यावर माशी किंवा झुरळ बसेल कि काय अशी मला भीती वाटत होती . मी अगदी एक चित्ताने त्याच्या वर नजर खिळवून बसले होते. अचानक वेटरनी तो केक परत डब्ब्यात भरला आणि एका माणसाच्या हातात कोंबला. हे सर्व इतके भरभर घडले कि आम्ही  दोघेही तोंड आssss करून बघत बसलो.

मी माझ्या पतीदेवाला म्हंटले,"बहुतेक त्यांचा ग्रुप मोठा असावा आणि त्यांची इथे बसायची व्यवस्था बरोबर झाली नसेल. ते दुसरी कडे कुठे तरी गेले असतील." ह्यावर माझ्या हजरजवाबी नवऱ्याने काढलेले उद्गार अगदी कौतुक करण्यासारखे आहेत. ते म्हणाले ," नाही तसे काही झाले नसेल. मला वाटते, केक कापण्याच्या अगोदरच त्या दोघांचा घटस्फोट  झाला असण्याची जास्त शक्यता आहे. हल्ली नाती बनवायला आणि मोडायला पाच मिनिटे सुद्धा लागत नाहीत. काळाच्या ओघात सगळेच बदलत आहे." त्यांचे हे  विश्लेषण ऐकून मन सूंद झाले.

खरंच, किती भेसूर सत्य त्या वाक्यात लपलेले होते. नाती जपण्यात जी एकप्रकारची मनाची मृदुलता , सहिष्णुता,  अध्वरता लागते ती हल्ली कुठे हरवून गेली आहे कोणास ठावूक ? प्रत्येक जण आपलेच खरे आणि श्रेष्ठ म्हणतो . Compatibilityच्या नावाखाली अगदी मनाला येईल तसे वागण्याचा प्रयन्त हल्लीची पिढी करत आहे. "मी आणि माझे" ह्या पलीकडे कोणाला काही दिसेनासेच झाले आहे. अशा ह्या जगात भगवंताच्या अनुसंधानात राहुन परमार्थ करण्याची रीत तर आता स्वप्नात सुद्धा जमणार नाही. कुठले प्रेम, कुठली आपुलकी, कुठला दिलासा, कोण कुणाचा …संपूर्ण घडीच बिघडली आहे. हातात काठी धरून जीवन समाधानाने जगू म्हणणाऱ्याच्या नशिबात आता हात पण परका झाला आहे आणि काठीचा तर कुठे सुगावाच लागत नाही आहे…. काय हा परकेपणा !!!!     

No comments:

Post a Comment