Sunday 9 September 2012


दाने दाने पर लिखा हैं खानेवाले का नाम....

१९८४ साली लग्न झाल्यावर आम्हा दोघांनाही आमच्या आयुष्यात कसे, केव्हा , कधी,....काय काय, घडणार आहे ह्याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. एकमेकांच्या प्रेमात धुंद झालेल्या त्या दोन जीवांना फक्त एकच त्या क्षणाला माहित होत कि, एकमेकांशिवाय आपण जगू शकत नाहीं आणि त्यासाठी लग्नाशिवाय दुसरा उपाय नाहीं. आता ह्या वयात आम्ही मागे वळून हळूच जेव्हा त्या काळात डोकावून पाहण्याचा प्रयन्त करतो , तेव्हा आमच्या धैर्याच, निर्धाराच, प्रेमानं एकमेकांना दिलेल्या वचनांच खरोखरच अचंबा वाटतो. तरुण वय किती वेड असते नाहीं ? लग्न झाल्यानंतर आम्हाला वाटले होते कि, आम्ही कायमचे मुंबईकर बनू आणि जीवनात येण्याऱ्या प्रत्येक क्षणाला आहे त्या परिस्थितीत तडजोड करून आपले जगणे रम्यमय करून आयुष्याचा अर्थ शोधून काढू. परंतु नशिबात दुसरेच काही तरी लिहून ठेवले होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनीच नवऱ्याची विदेश यात्रा जी सुरु झाली ती अजूनही २०१२ पर्यंत चालूच आहे. मधल्या काळात, दोघानंही मुलींसकट एकत्र राहावयास मिळावे म्हणून मी माझी नौकरीचा दिलेला राजीनामा , नन्तर मुलींच्या शिक्षणाचे हाल होवू नयेत आणि त्यांना उत्तम प्रतीचे ज्ञान मिळावे म्हणून अगदी हौशीच्या वयात दोघांनी जाणूनबुजून दूर राहून सहन केलेला विरह ...अशा कित्येक प्रमेयांशी आम्ही केलेल्या प्रयोगात आम्ही खूप ठिकाणी फिरलो. नवनवीन देश बघितले, अनंत प्रकारचे लोक भेटले, काहींनी आमच्या मनात कायमची जागा केली तर काही वाटेतले फक्त सह-प्रवासी निघाले. अशा या प्रवासात आम्हाला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट ज्यावर आम्ही दररोज चर्चा करतो, ती म्हणजे, कुठल्यातरी परक्या ठिकाणी येवून ध्यानीमनी नसताना कुठे तरी दुसऱ्या ठिकाणी कोणी तरी अनोळख्या माणसांनी उगवलेला अन्नाचा कण आपल्या मुखात जातो आणि आम्ही  त्या कर्ता-करवित्याला धन्यवाद देतो. खरच १९८४ मध्ये आम्हाला या किमयेची जरा सुद्धा कल्पना नव्हती कि २०१२ पर्यंतच्या काळात मी १० देशातील आणि आनंद २०-२२ देशातील अन्नाच्या कणाचा आनंद भोगू म्हणून !!!! 

पर्यंतू, हल्ली आपल्याला अनेक देशात उत्पन्न केलेल्या धान्य, फळ, कपडे इत्यादींचा आनंद घर बसल्या घेता येतो. आधुनिक जगात सर्व काही एका चुटकीत मिळते. परवाच आम्ही सुपर मार्केट मधून बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या. घरी आल्यावार लिस्ट पाहिली तर मला एकदम धक्का बसला ....त्या मध्ये पाकिस्तानी दुधी, श्री लंकेचा पपया , भारताची चवळी, इंडिअन लिंबू, इंडिअन कांदा, ऑस्ट्रेलियाची गाजर, दुबई ची काकडी, लेबेनान चे बटाटे, मलेशियाचे टोमाटो, चीनचे पेअर , हॉलंड ची संत्र ......बापरे, नऊ देश आणि एकच लिस्ट आणि खाणारी तोंड फक्त दोन !!! मज्जा आहे कि नाहीं !!   

श्री गणेशाची साडेतीन पीठे : 

पहिले पीठ - मोरगाव :'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. येथे गणेशापुढे एक नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य. नाहि तर शक्यतो आपण नंदिचे दर्शन केवळ महादेव शंकरांच्या मंदिरात करतो. पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे. पुणे ते मोरगाव एस.टी. आहे.


दुसरे पीठ - राजूर : मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला. मोरगावी कमलासुराचे शिर पडले आणि जिथे कमरे पर्यंतचा भाग पडला ते राजूर येथे दुसरे पीठ. राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. व
 रण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.

मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती सुद्धा आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.
हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर, राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते. 

तिसरे पीठ - पद्मालय : येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुस
 री डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.

समुद्रमंथनाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत-कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वीला तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद श्री गणेशाने त्याला दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धरणीश्वर गणेश' असे म्हणतात.



अर्ध पीठ, चिंचवड  : चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. परंतु महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्या मुळे याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील 'शाली' नावाच्या गावचे वामनभट व पार्वतीबाई हे दांपत्य मोरगावला आले. या दोघांनी पुत्रप्राप्तीसाठी अनुष्ठान केले. त्यांना माघ वद्य चतुर्थी शके १२९७ मोरगावला श्रीगणेशकृपेने मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी 'मोरया गोसावी' ठेवले.

नयनभारती यांच्याकडून अनुग्रह घेतलेले मोरया गोसावी थेऊरला अनुष्ठानासाठी आले. तिथे त्यांना मुळा-मुठेच्या नदीत स्नान करताना श्रीगणेशाचा साक्षात्कार होऊन श्रीगणेशमूर्तीचा तांदळा स्वरुपात प्रसाद मिळाला. ती मूर्ती घेऊन ते मोरगावी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला, म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते. चिंचवड हे ठिकाण पुण्यापासून १८ कि.मी. आहे.

।। ॐ गं गणपतये नमः ।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।
 

No comments:

Post a Comment