Friday 5 April 2013


शेवटचे दोन चमचे …


शुक्रवार …. मिडल इस्ट मधला आठवड्यातील सुट्टीचा पहिला दिवस !! आपल्याकडे weekends  हे नेहमी साफसफाई साठी ठरलेले असतात . लहानपणी रविवारी सकाळी दहा / अकरा वाजेपर्यंत आम्हाला अगदी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा कधी झोपायला परवानगी मिळत नसे. वडील सकाळी सकाळी आमच्या हातात धूळ पुसायचा कपडा हातात द्यायचे आणि दुपारच्या वेळी आमची आई आमच्या हातात embroidery ची सुई हातात द्यायची !!! अशा दिनचर्येत बाकीच्या दिवसात सकाळी सहा वाजेपर्यंत झोपायला मिळाले तरी आम्ही एकदम खुश !! हल्लीच्या दिवसात हे सर्व बदलले आहे. नोकरी करणारे आई-बाप स्वतःला विश्रांती मिळावी म्हणून मुलांना उशिरापर्यंत झोपायची अगदी बेशक परवानगी देतात. आणि अशाप्रकारे  उशिरा सुरु झालेला दिवस , 'मला आज स्वयंपाक करण्याचा अगदी कंटाळा आला आहे . आपण बाहेर जेवायला जावू या का ?' असे म्हणत म्हणत अगदी पार चित्रपटाच्या रात्री च्या शो पर्यंत येवून ठेपतो . ह्या सर्व मजा मस्ती मध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाही आणि घरातल्या बारीक सारीक गोष्टी  कडे नकळत दुर्लक्ष्य होते . मुलांच्या मनावर या अशा दिनक्रमाचा ठसा  कायमचा बसतो आणि मोठेपणी अगदी विनासायास ह्या सर्व कृतींचे अनुकरण होत जाते. आम्ही पण ह्या 'मस्त मजेच्या' जीवनाचा  थोडे दिवस का होईना अनुभव घेतला आणि लवकरच त्यातून बाहेरही पडलो. कारण आमच्या मनावर झालेले संस्कार  वेगळे होते. घरात तेलाची बाटली संपली कि ती उलटी करून त्यातला एक एक थेंब वाटीत गोळा होईपर्यंत बाटली मी अजूनही बाहेर फेकत नाही. गाळणीतल्या  चहा पत्तीचा चमच्याने दाबून दाबून पूर्णपणे अर्क काढून  कोरडी झाल्यावर मगच ती कचऱ्याच्या बकेट मध्ये फेकली जाते. डब्यातले दही संपल्यावर त्यात पाणी घालून पूर्णपणे घुसळून झाल्यावरच तो डब्बा फेकला जातो. बऱ्याचदा  माझ्या अशा ह्या सवयींची लोकांनी चेष्टा  केली आहे. परंतु काय करणार 'सुंभ जळतो पण पीळ जळत नाही अशातली गात झाली आहे. असू देत !!!    

तर अशा एका शुक्रवारी सकाळचा चहा झाल्यावर घरातला शेवटचा दुधाचा डब्बा पूर्णपणे रिकामा करून कट्ट्यावर ठेवला. परंतु नेहमी प्रमाणे उलटा करून त्यातला एक एक थेंब मात्र गोळा केला नव्हता. कसे कुणास ठावूक माझ्या आवडत्या सवयीने मलाच हळुवारपणे हुलकावणी दिली होति. सकाळची गाणी ऐकत , वर्तमान पत्र चाळत आणि पतीदेवाबरोबर गप्पा मारता मारता काही तरी मस्त पैकी चवदार करून खायची इच्छा झाली. Sweet Corn & Green Capsicum Rice ची recipe करून बघायचे ठरवले. लागणारी सर्व सामग्री जुळवून घेतांना अचानक लक्षात आले कि केशर उगाळण्या साठी लागणारे दोन चमचे दुध नाही आहे. गडबडीने माझा हात कट्ट्यावर ठेवलेल्या रिकाम्या दुधाच्या डब्ब्या कडे अगदी अधिरतेने नकळत गेला. देवाचे नाव घेत डब्बा उस्सुकतेने उलटा केला आणि जोराजोराने वरून थोपटला. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी इतकी आशावादी कधीच झाली नव्हते. त्या दोन चमचे दुधाच्या गरजेने माझ्या आशावादी स्वभावाची अगदी जणू काही परीक्षाच घ्यायची ठरवली होती. हुलकावणी दिलेल्या सवयीने मिश्किलपणे हसत हसत माझी मदत केली आणि बरोब्बर दोन चमचे दुध त्या रिकाम्या डब्ब्यातून काढून दिले. ख़ुशी खुशीने तो तीन रंगी भात केला आणि नवरा-बायकोने मिळून मजेत खाल्ला. स्वयंपाक घरात झालेल्या माझ्या ह्या फजितीची पतीदेवाला जरा सुद्धा कल्पना नव्हती. 

तात्पर्य, ह्या घटनेनी मला काय शिकवले ?…. आशावादी असणे चांगले आणि कधी कधी सुंभाबरोबर पीळ जळला तरी आपला फायदा होण्याची शक्यता असते !! आता मला समजले कि, का माझ्या दोन्ही लेकी मला सारखं सांगत असतात कि, "अम्मा, it's perfectly ok to be imperfect ." ह्या पुढे जीवापाड जपलेल्या सवयी मी जरा जपून वापरण्याचा निर्णय केला !!!  पटलं ना तुम्हांला पण ?

No comments:

Post a Comment