Monday 8 April 2013


गुढी पाडवा !



चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३५

महत्वः
वर्षारंभ करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ख्रिश्चन कॅलेन्डर नुसार १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो, आर्थिक वर्षारंभ १ एप्रिला होत असतो, हिन्दु वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला होत असतो, तर व्यावहारिक वर्षाचा आरंभ हिन्दु मान्यतेनुसार कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासुन होतो. ह्या सर्व पद्धतींमध्ये वर्षभरात एकूण बारा महिने असतात. पण ह्या सर्वांत प्रश्न असा पडतो की, वर्षात बाराच महिने असतात हा सिद्धांत प्रथम कुणी मांडला? व सर्व जगाने ते मान्य कसे केले? निःसंशय ही संकल्पना सर्वप्रथम आपल्या अतिप्राचिन वेदांतूनच आली आहे. वेदांनुसार वर्षांत बारा महिने असतात हे सर्वांनी मान्य केले. आणि या सर्वांत वर्षारंभासाठी हिंन्दु मान्यतेनुसार सर्वात योग्य दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा मानला गेला आहे. हिन्दु मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच हिन्दु नववर्षाचा पहिला दिवस का असावा याला अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि अध्यात्मिक कारणे आहेत. 

नैसर्गिकः
चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी (पाडवा) सूर्य वसंत ॠतूत प्रवेश करतो (विषुववृत्त व रेखावृत्त यांचा छेदनबिंदू) व वसंत ॠतूला सुरुवात होते. श्रीमद् भगवतगीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "सर्व ॠतूत ऊल्हासदायक वसंत ॠतू हे माझे प्रकटीकरण आहे". ह्या ॠतूत सर्व वातावरण ऊल्हासित व आल्हाददायक असते. शिषिर ॠतूत झाडांची पाने गळतात व पाडव्याला, वसंताचे आगमन होउन त्यांना नविन पालवी फुटायला सुरुवात होते. 

ऐतिहासिकः
ह्याच दिवशी रामाने वालीचा वध केला होता. ह्याच दिवशी भगवान श्रीराम सर्व राक्षसांचा व रावणाचा वध करुन अयोध्येला परतले होते. शालिवाहन राजाने त्याच्या शत्रूंना परभूत केल्यानंतर शालिवाहन शकाचा (दिनदर्शिकेचा) आरंभ म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. 

अध्यात्मिकः
विश्वाची निर्मीतीः पाडव्याच्या दिवशीच ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मीती केली असे मानले जाते म्हणूनही हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जातो. 

साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्तः हिन्दु मान्यतेनुसार गुढिपाडवा, दसरा (विजया दशमी) आणि कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसाचा (बलिप्रतिपदेचा) असे प्रत्येकि एक आणि अक्षय्य तृतिया अर्धा मुहुर्त असा अंतर्भाव करुन "साडेतिन मुहुर्त" योजिले गेले आहेत. या साडेतिन मुहुर्तांचे वैशिष्ट्य असे की या दिवशी कोणत्याही धार्मिक विधी करायला शुभ मुहुर्त काढावा लागत नाही. या साडेतिन दिवसातला प्रत्येक क्षणच शुभ मानला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्याच्या पद्धतीः 
अभ्यंगस्नानः ह्या दिवशी पहाटे लवकर उठून तेल व उटण्याने अभ्यंगस्नान केले जाते. नित्याच्या स्नानाने रज आणि तम गुण १/१,००,००० % (एक लक्षांश्) ने सौम्य होतात, तर सत्व गुण तितक्याच पटीने वाढतात व त्यांचा प्रभाव फक्त तीन तास टिकतो. हाच प्रभाव तेल व उटण्याने अभ्यंग स्नान केल्यास चार ते पाच तास टिकतो. अभ्यंगस्नानात तेलाने केलेल्या मालिश मुळे त्वचेकडून तेल शोषले जाते व त्यानंतर केलेल्या कोमट पाण्याच्या स्नानाने त्वचा तुकतूकीत व तजेलदार बनते. तेलाच्या मालिश नंतर केलेल्या स्नानाने त्वचा व केसांकडून हवा तेवढाच तेलकटपणा राखला जातो. म्हणुनच अंघोळीपूर्वी तेलाने मालिश करणे कधीही उत्तम. अंघोळीनंतर तेलाने मालिश करणे कधीही अयोग्य. धर्म ग्रंथांनुसार अभ्यंगस्नानसाठी पाच दिवस सांगितले आहेतः १. नववर्षारंभ अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडवा (संवत्सर). २. वसंतोत्सवारंभ अर्थात फाल्गुन शुक्ल प्रतिपदा किंवा धुलिवंदन. ३. दिवाळीचे तीन दिवस; अश्विन शुक्ल चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अश्विन अमावस्या (लक्ष्मी पुजन), व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा).

दारावरील सजावटः अभ्यंगस्नानानंतर दारावर आंब्याच्या डहाळ्या व फुलांचे तोरण बांधले जाते. ह्या दिवशी लाल रंग शुभ असल्याने तोरणात शक्यतो लाल फुलांचा वापर करतात.

धार्मिक पूजाः पाडव्याच्या दिवशी महाशांती पूजा व होम हवन केले जाते. होम हवनात ब्रम्हमंत्र व विष्णू महामंत्राचा जाप केला जातो. त्यानंतर ब्राम्हणांना दक्षिणा अथवा धर्मग्रंथ किंवा पुराणांच्या स्वरुपात दान ऐपतीप्रमाणे दान केले जाते. असे म्हटले जाते की शांती केल्याने सर्व पाप धुतले जातात, पापवृत्ती नाहीशी होते, आरोग्य सुधारते व संपन्नता वाढते. तसेच संवत्सर पूजा केल्याने पाप धुतली जातात, आयुष्यमान वाढते, स्त्रीचे सौभाग्य वाढते व मनःशांति लाभते. 

गुढी उभारणेः प्रत्येक घरावर उभारलेली गुढी (किंवा ब्रम्हध्वज) ही भगवान श्रीरामचंद्रांच्या रावणावरील विजयाचे व त्यांच्या अयोध्यागमनाचे प्रतिक मानले जाते. विजयाचे प्रतिक असल्या करणाने गुढी उंचावर उभारण्याचा प्रघात आहे. गुढी उभारतांना साधारणपणे पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे भरजरी वस्त्र एका काठीवर बांधुन कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या व फुलांच्या हाराने गुढी सुशोभित केली जाते व त्यानंतर चांदीचे अथवा तांब्याचे भांडे त्यावर उपडे ठेवुन गुढी उभारली जाते. त्यानंतर गुढीची मनोभावे पूजा केली जाते. ह्या दिवशी गुढीच्या माध्यमातून प्रजापति लहरी घराच्या वातावरणात प्रवेश करतात व घरात संपन्नता व सुबलता आणतात. पुढे हेच भांडे पिण्याच्या पाण्यासाठी वापरले गेल्यास त्यातल्या पाण्यावरील प्रजापति लहरींचा प्रभाव आपण वर्षभर अनुभवू शकतो.

।। गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया ।। 
                                                    (courtesy: Shree Siddhivinayak Ganapati - Mumbai )

No comments:

Post a Comment