Tuesday 16 April 2013


श्यामची आई … 



"आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर ,मांगल्याचे सार, आई माझी" - साने गुरुजी.

लहानपणी शाळेत असतांना साने गुरुजींचे "श्यामची आई" पुस्तक अगदी मनापासून वाचल्याचे अजूनही लक्षात आहे. कोवळ्या वयात त्या वेळी ह्या पुस्तकातील मातेच्या ममतेच्या महाकाव्याचे मनावर जसे ठसे उठावेत तसे उठले नसावेत ह्याची जाणीव मागच्या महिन्यात स्वतः आईच्या भूमिकेतून हे पुस्तक परत एकदा वाचल्यावर समजले आणि मन खिन्न झाले. यशोदाबाई ने श्यामला दिलेल्या अनमोल संस्कारांचा ठेवा मधून तयार झालेली साने गुरुजींची कोमल वृत्ती, ह्याबद्दल या पवित्र पुस्तकात वाचतांना डोळ्याच्या कडा कितीवेळा पाणावल्या आणि उचंबळून आलेल्या मनातल्या भावनांनी अश्रू मार्फत कधी आणि कसा उच्चार केला हे कळालेच नाही. धन्य ती माता  कि जिने जगाला दाखवून दिले कि  आईचे प्रेम आंधळे नसते. तिचे प्रेम स्वावलंबनाचे धडे देते. अभिमानाने जगायला शिकवते, द्वेष-मत्सरापासून दूर राहायला सांगते. गरिबीत राहून ध्येयवाद दाखवणारी आई, प्रसंगी कठोर होऊन शिक्षाही करते. आणि धन्य ते साने गुरुजी कि ज्यांना अशा मातृ प्रेमाचे अमृत भरभरून पिण्याचे भाग्य मिळाले.  

अंघोळ झाल्यावर श्याम आईला पाय पुसायला सांगतो. त्यावेळी आई म्हणते ''श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा. मनाची शुध्दी करण्याकरिता देवाने अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहे''. भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा बुवांना चिडविण्यासाठी मोठयाने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते, ''देवाची भक्ती ही मोठयाने नाही तर ह्दयातून केली तर देवा पर्यंत पोहोचते.'' बंधू प्रेमाचे धडे 'चिंधीच्या' गाण्यातून समजावून सांगणारी आई, पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चाबकाचे फटके ओढणारी आई, श्यामला कळया न तोडू देणारी आई, महार असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई, गरीबीतही ताठ मानेने जगणारी आई, आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून कष्ट करणारी श्यामची आई.....अशी अनंत रूपे साने गुरूजींनी ४५ भागात लिहून काढली आहेत. 

आतड्यांना पीळ पाडून करुण रसाच्या उदात्त व प्रशांत वातावरणात नेणाऱ्या "श्यामच्या  आई" ने आपल्या समोर एक आदर्श जीवनपद्धती ठेवली त्यात मी स्वताः कुठे कमी पडले हे समजावून घ्यायला फारशी अडचण झाली नाही. विश्वातल्या कोणत्याही संकटाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची व या विश्वनिर्मात्यावर दृढ विश्वास ठेवण्याची शिकवण देते, वैचारिक चळवळ घडवणारी, प्रेरणादायी आणि नैतिक मूल्य जपणारी अशी शिकवण देणाऱ्या श्यामच्या आई पुढे आपण किती लहान आहोत याची उशिरा का होईना पण जाणीव झाली. एक क्षणी असे वाटले की , हेच पुस्तक जर मी कित्येक वर्षापूवी जेव्हा माझ्या लेकी लहान होत्या तेव्हाच वाचले असते तर त्यांची मानसिक घडण वेगळी झाली असती काय किंव्हा यशोदाबाई  प्रमाणे मी सुद्धा निस्वार्थ प्रेम करून त्यांच्यावर  संस्कार करू शकले असते काय…? ती वेळ आता माझ्या हातातून निसटून गेली काय? आईसाठी तिची अपत्य कधीच मोठी होत नाहीत, मग मी  कसे मान्य करू की ती वेळ माझ्या हातून निसटून गेली म्हणून? आईच्या प्रेमासाठी आणि संस्कारासाठी मुलांच्या वयाची आडकाठी का बरे यावी? पोटचा गोळा हृदयाला कवटाळण्या करिता मातेला का कुणाची परवानगी घ्यावी लागते? श्यामच्या आईचे अनाकालीन झालेल्या मृत्यूमुळे, माझे असे अनेक प्रश्न अनुत्तरीच राहीले आहेत. प्रत्येक क्षणाला बदलत असलेल्या नीतीमुल्याच्या ह्या आधुनिक जगात, मी आधुनिक श्यामच्या आईची अगदी उत्कंठतेने वाट पाहत आहे. 

2 comments: