Thursday 5 July 2012




"वासरी म्हणजे मनाचा आरसा. जीवनाच्या ओसरीवर जोवर आपली पथारी पसरली आहे, तोवर नित्य ह्या आरशात आपल्या मनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे." (पु. ल. देशपांडे यांचे बटाटयाची चाळ यातील टिप्पण. ) वासरी ह्या शब्दाने माझे मन इतके काही भारावून गेले की माझ्या ब्लॉग चे नामकरण मी "वासरी " म्हणूनच करावयाचे ठरवले. वयाची ५१  वर्षे उलटून गेली आहेत. आयुष्यात बरेच चढ उतार बघितले. पण उतारावर कधी वेगाची भीती वाटली नाहीं किंवा चढावर कधी उसासा टाकला नाहीं. हे सर्व साध्य झाले ते देवाची कृपा आणि मोठ्यांचे आशीर्वाद होते म्हणून. ह्या सर्व घडामोडीत मन मात्र सारखे हेलकावे खात असे. "मन" म्हणजे आहे तरी काय ह्याच्या बद्दलची गूढता वाढत्या वयाबरोबर वाढत आहे. एकीकडे देवा वरचा विश्वास वाढत आहे तर दुसरी कडे  ह्या गुढते बद्दलचे आकर्षण ही प्रज्वलित होत आहे. अशा वेळी वाटते, आपल्याला कोणीतरी बोट धरून एक आनंदमयी वाट दाखवावी म्हणजे ह्या जन्माचे सार्थक झाले. मनाचा हा असा आरसा की ज्याच्यावर कित्येक गोष्टी  लिहिल्या आणि पुसल्या, नेहमी हसत खेळत राहावा ह्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार ह्यात मतभेद नाही. बघूया पुढे काय काय होते ते......... 

No comments:

Post a Comment