Tuesday 10 July 2012



उशी

माझ्या जीवनात आत्तापर्यंत माझे आणि उशीचे कधीच जमले नाहीं. बालपणात मला कळू लागल्यानंतर, उशी मला नेहमीच खुणावून बोलवीत असे. पर्यंतू, वडिलांच्या धाका खाली अभ्यास करताना, उशीचा उपयोग अगदी मर्यादित होता. त्यामुळे, मला तिच्यावर नेहमीच राग यायचा आणि अभ्यासाच्या त्र्यागाखाली तिचा फारसा असा सहवास लाभलाच नाहीं. मोठी झाल्यानंतर माझा संसार सुरु झाल्यावर, जेंव्हा पूर्णपणे स्वंतंत्र पणा लाभला, तेंव्हा उशी किती कडक आणि जाड असावी हे ठरवण्यात सगळा वेळ वाया गेला. अजूनपर्यंत मला पाहिजे तशी उशी मिळाली नाहीं आहे. त्यात हल्ली झोपही बरोबर लागत नाहीं. एकूण काय तर, चढत्या आयुष्यात माझे, उशीचे आणि माझ्या झोपेचे एकमेकांशी अगदीच जमत नाहीं. पण ह्या धुसमुस्त्या संबधातून  नकळत उशीची झालेली माझी मैत्री मला परवाच अचानक कळून आली. समझाल्यावर, मी गालातल्यागालात खुदकन हसले. आयुष्यात अशा कित्येक गोष्टीशी / पुष्कळ जणाशी आपले बरेच वेळा पटत नाहीं परंतु आतल्या आत आपले कुठेतरी कसेतरी त्यांच्याशी सलोख्याचे नाते आपल्या नकळत जुळलेले असते. 

कॉलेज मध्ये असताना, रात्री जप करून मी जपमाळ उशीखाली ठेवून द्यायची. लग्न झाल्यावर जपमालेबरोबर विक्सचा डब्बा त्यात add झाला. कित्येक दिवस या दोनच गोष्टी उशीखाली अलगद विश्रांती घ्यायच्या. किती नकळत , उशीच्या भरवश्यावर मी या दोन गोष्टी जपून ठेवायची. परवा साफ करण्यासाठी मी उशी जेंव्हा बाजूला काढली, तेंव्हा तिच्याखाली नकळत  मांडलेला माझा संसार पाहून मला माझ्या चढत्या आयुष्याचे आणि उशीच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाची मला जाणीव झाली. आता उशीखाली जपमाळ, टायगर  बामचा डब्बा, डोळ्यात घालायचे ड्रोप्स, हाताला लावायचे मलम, लिपबाम या सर्व गोष्टी अगदी आरामसे विसावा घेतात. किती भरवसा आहे त्यांना उशीवर !! या सर्व गोष्टींची काळजी घेत असताना, उशीने एक दिवस सुद्धा मला माझी पन्नाशी उलटल्याची जाणीव करून दिली नाहीं. उलट, मला साखरेची झोप कशी लागेल या साठी ती आजसुद्धा धडपडत असते. आयुष्यात आपण ज्यांना प्रिय असतो ती माणसेसुद्धा आपल्याला अशीच जपत असतात, आपल्या नकळत आपल्यावर प्रेम करत असतात. आपण उगीचच अशा खऱ्या प्रेमासाठी रानात वणवण फिरतो. पण आता मला अशी  वणवण फिरण्याची गरज नाहीं. माझा आणि माझ्या उशीचा आता एकदम मस्त मिलाप झाला आहे. आम्ही दोघेही आता एकमेकांवर एकदम खुश आहोत. उशी आणि ख़ुशी ........      

No comments:

Post a Comment