Sunday 15 July 2012


हतबल


२००१ च्या मे महिन्यातल्या पहिल्याच  दिवसाची पहाट इतकी भयंकर आणि काळोखी असेल याची एप्रिलच्या शेवटच्या दिवशी मला तिळमात्र कल्पना नव्हती. दादांना (माझे वडील)  दवाखान्यात admit केलय ह्या उगीचच दिलासा देणाऱ्या बातमीपासून , "मायाक्का, दादा आपल्याला सोडून गेले." ही खरी बातमी कळण्या मध्ये फक्त ३० मिनिटांचे अन्तर होते. मद्रास ते बंगलोर ह्यामधील ६ तासांचे अंतर ६ युगासारखे वाटलं.  वाटेवरून जात असतांना दादांच्या कित्येक आठवणींनी मनात एकच कल्लोळ माजविला होता. वरून वज्रासारखे दिसणारे माझे दादा आतून एकदम लोणीसारखे मऊ होते. पण त्यांना समजवून घेण्याची आमची पात्रताच नव्हती. ज्या व्यक्तीने बालपणी वार लावून जेवण करून खूप खटपट करून अभ्यास करून , जीवनात खुपसे काही साधले , त्या व्यक्तीच्या मनातली तळमळ आम्हाला कधी कळलीच नाहीं. आपण असं का केले याच्याबद्दल आता पश्चाताप होतो. का प्रत्येकवेळी प्रसंग सरून गेल्यानंतर आपले डोळे उघडतात ? 

बंगलोरला पोहचल्यानंतर, निपचित पडलेला दादांचा देह पाहून कंठ भरून आला. दादा नेहमी सांगायचे, "मी घोड्यासारखा आहे. घोडा कधी बसत नाहीं आणि तो ज्या दिवशी बसतो तो दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरतो." जीवनातल्या कठीण आव्हानांबरोबर पळता पळता दादा थकून झोपले होते. किती शिकण्यासारख होतं त्यांच्याकडून... फक्त नशीबवान मुलांना असे बाबा मिळतात !! समाधान एकाच गोष्टीचे आहे कि, दादा फक्त देहाने आमच्याबरोबर नसले तरी त्यांची चैतन्य शक्ती आजही आमच्याबरोबर आहे. 

दुसऱ्या दिवशी, दादांच्या डेस्क वर सहज नझर पडली. Association ला द्यायचा maintenance चा चेक़ त्यांनी ०१/०५/२००१ तारीख घालून तयार ठेवला होता. Pay-in-slip बुक मध्ये ०१/०५/२००१ ची तारीख घालून बँकेत जमा करायचे चेक़ तयार करून ठेवले होते. एक क्षण दादा आजूबाजूलाच आहेत असा भास झाला. मनुष्य कधी कधी गोड फसवणुकीत कसा एकदम रमून जातो.. सत्याची जाणीव झाल्यावर काळ किती कठोर आहे याची जाणीव होते. 

ह्या दोन गोष्टी ३० एप्रिल ला करताना, दादांना स्वताच्या अतिंम क्षणाची जरासुद्धा चाहूल लागली नसेल. माणूस जिवंतपणी सर्व गोष्टींबद्दल आढावे घेवू शकतो, परंतु स्वताच्या अतिंम क्षणाबद्दल मात्र तो एकदम हतबल असतो. त्या एक शेवटच्या क्षणापर्यंत तो खरच किती आशावादी असतो, किती स्वप्नं उराशी बाळगून असतो, किती काही करायचं असतं त्याला तो एक क्षण येईपर्यंत, तो क्षण येईपर्यंत आपण अजून काही अनुभवलेच नाहीं असे त्याला का वाटत असते, का ह्या क्षणाची तो आधीपासूनच तयारी ठेवत नाहीं, का देवाने ह्या एका गोष्टीबद्दलची आपली भावना आपल्यात एकदम सुप्त ठेवली आहे.....असे  अनेक प्रश्न मनात सैरावैरा धावू लागले. पण नंतर लक्षात आले, आशावादी, स्वप्नाळू , सतत धडपड करणाऱ्या दादांनी, त्यांना न कळताच दैहिक घराचा उंबरठा ओलांडला, हे एका दृष्टीने चांगलेच झाले. नाहीतर जिवंतपणीच ते हतबल झाले असते.  

No comments:

Post a Comment