Monday 23 July 2012


भावुक मन.... 

फक्त १५ मिनिटा पूर्वी स्वयंपाकघरातला कुकिंग ग्यास संपला. एक क्षणी वाटले, बरे झाले , "आत्ताच संपला, उद्या सकाळी सकाळी संपला असता तर, माझ्या आवडत्या चहाचे, कि ज्या साठी मी दररोज सकाळी डोळे उघडते आणि देवाचे मंत्र म्हणत-म्हणत, मस्त पैकी आले घालून तयार करते, तो चहा मला अव्वल एक-दोन तास तरी उशिरा मिळाला असता. खरच देव आपली साध्या-साध्या गोष्टीतही किती काळजी घेतो !!" आता ह्या घटनेचा आणि देवावरच्या श्रद्धेचा कितपत संबध आहे , ह्या वर विचार करण्याच्या मनःस्थितीत मी, आयुष्याच्या ह्या वळणावर, आणि  ह्यानंतर तरी कधीच असणार नाहीं. हल्ली सर्वच गोष्टीत, "तो कर्ता, मी नाहीं", असे खात्रीपूर्वक वाटते. मन समाधानी आणि आनंदी ठेवायला ह्या खात्रीची, मला वाटत खूप आवश्यकता आहे. काही चांगल पाहायला मिळालं, वाचायला मिळालं, करायला मिळालं....कि असं वाटत कि, "देवाची कृपा आहे म्हणून तर आपल्याला हे सर्व मिळतंय, बारीक सारीक गोष्टीत त्याचं  अस्तित्व जाणवते !! आणि वयाच्या ५२ व्या वर्षी, "मी कोण?" हे जाणून घेताना, आपण डोक्यावर किंव्हा पोटावर किंव्हा पाठीवर हात न ठेवता छातीवर का ठेवतो हे जरा-जरा कळू लागलंय !! ". असा विचार मनात चालू असताना, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी , सोरटीच्या सोमानाथाबद्दल वाचायला मिळाले, ही सुद्धा एक प्रकारची देवाची कृपा नव्हे का ?

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार.  सर्व श्री गणेश भक्तांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. 
आज सोमवारपासुन आपण बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि माहिती घेणार आहोत. 

१) सोरटिचे श्री सोमनाथ :- भगवान श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ...श्री सोमनाथाचे हे आद्य ज्योतिर्लिंग व स्वयंभु देवस्थान जाज्ज्वल्य आणि जागृत आहे. श्री सोमनाथाच्या अस्तित्वाची प्रचीति अनेक भक्तांनी घेतली आहे. भारतीय शिल्पकलेचा आणि स्वर्गीय सौंदर्याचा उत्कृष्ट नमूना म्हणून गुजरातमधील श्री सोमनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र शैवतीर्थ, अग्नितीर्थ आणि सूर्यतीर्थ म्हणूनही प्रसिद्ध आहे. अनेक सिद्धपुरुषांचा सहवास या ठिकाणी लाभतो. या पवित्र स्थानाचा महिमा काही आगळाच आहे. हजारो भाविक श्रद्धा आणि भक्तीपोटी वर्षभर येथे दर्शनासाठी येत असतात. सोरटीचा हा श्री सोमनाथ महाराष्ट्रात शिखर शिंगणापूरला आणि बारामतीजवळ करंजे गावी भक्तांना दर्शन देण्यास आल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत.

स्वयंभु महादेव :-
स्वयंभु असलेल्या श्री सोमनाथाच्या आजूबाजूचा निसर्गही जणू सोमनाथाच्या भक्तीत तल्लीन झाला असावा, असे वाटते. वेरावळ बंदर आणि प्रभातपट्टण या गावाभोवती ‘‘जय सोमनाथ जय सोमनाथ’’ असा जयघोष जणू आसमंतात दुमदूमत असतो. घाटाच्या पायर्‍यांवर आपटणार्‍या लाटांमधून जणू ‘जयशंकर जयशंकर’ असा घनगंभीर आवाज निघत असतो, तर मंदिरावरील प्रचंड सुवर्णघंटेतून ‘‘ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय’’ असा जयघोष निनादत असतो. वेगवेगळ्या जयघोषांचे निनाद मिसळून भगवान श्री शंकर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र असल्याचे भक्तांना जाणवत रहाते !

सोमनाथ मंदिराची पार्श्वभूमी :-
गुजरात-सौराष्ट्रामधील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. वेरावळ बंदरापासून सुमारे तीन मैल अंतरावरील प्रभातपट्टण या प्रसिद्ध शैवपंथीय तीर्थक्षेत्रात समुद्रकिनार्‍यावर सोमनाथाचे मंदिर आहे. गुजराथमधील नागर शैलीची सध्या उद्ध्वस्त स्थितीत असलेली मध्ययुगीन काळातील मंदिरे समृद्ध, नाजूक कोरीव काम असलेली म्हणून प्रसिद्ध आहेत.

तीर्थक्षेत्र भास्कर प्रभातपट्टण :-
स्कंद पुराणात अशी कथा आहे की, ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपल्या कन्यांपैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या. त्या नक्षत्रकन्यांपैकी रोहिणीशीच चंद्र रममाण व्हायचा. इतर कन्यांनी दक्षाकडे तक्रार केली. त्याने चंद्राला सांगून पाहिले; पण चंद्राने नकार दिल्याने नाईलाजाने दक्षराजाने त्याला ‘क्षयी’ होशील असा शाप दिला. शापमुक्त होण्यासाठी चंद्राने भगवान श्री शंकराची आराधना केली. श्री शंकराने प्रसन्न होऊन चंद्राला वरदान दिले व त्या ठिकाणी गुप्त झाले. त्याच ठिकाणी अग्निज्वालेसारखे सूर्याप्रमाणे तेजस्वी एक दिव्य ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले. त्या ज्योतिर्लिंगाची चंद्राने तेथे प्राणप्रतिष्ठा केली आणि सुवर्णमंदिर बांधले. या स्थळाचे दर्शन घेणार्‍या भक्तांचा क्षयरोग बरा होईल असे त्याने सांगितले. चंद्राने म्हणजेच ‘सोमा’ने स्थापिलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. चंद्राला याच ठिकाणी ‘पुनःप्रभा’ प्राप्त झाली; म्हणून या ठिकाणाला ‘प्रभातपट्टण’ हे नाव पडले. प्रभातपट्टणच्या परिसरातच पूर्वी अगस्ती ऋषींनी समुद्र प्राशन केला होता. रावण, पांडव तसेच राजा जनमेजय यांनी या ‘भास्कर प्रभातपट्टण’ तीर्थाचे दर्शन घेतल्याचे संदर्भ पुराणात आहेत. रावणाने रूप्याने तसेच श्रीकृष्णाने चंदनाने श्री सोमनाथाचे मंदिरे बांधले होते.

प्राचीन मंदिराची रचना :-
मंदिराच्या रचनेत चौकोनी आकाराचे गर्भगृह आणि त्यावरील शिखर आणि त्याच्यापुढे अष्टकोनी आकाराचा एक विशाल स्तंभयुक्त मंडप होता. त्यात दोन सहस्र भाविक सहज बसत असत. मंडपात ५६ शिशाचे खांब असून ते रत्नांनी मढवलेले होते. मंदिराचे सर्व शिल्प अप्रतिम होते.

गर्भश्रीमंत श्री सोमनाथ :-
शिवपिंडीखाली विपूल द्रव्य आणि रत्ने यांच्या राशी होत्या. अमाप असा द्रव्यसाठा देवाच्या भांडारगृहात असायचा. मुख्य मंदिरासमोर सुमारे २०० मण वजनाची प्रचंड सुवर्णशृंखला आणि घंटा होती. मंदिराच्या खर्चासाठी दहा हजार गावांचे सुमारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न होते. देवाला हिरे-माणकांचे अलंकार तसेच सोन्या-चांदीची पूजेची उपकरणे होती. मंदिराच्या गाभार्‍यात रत्नदीपांचा लखलखाट अहोरात्र असायचा आणि कनोजी अत्तराचे नंदादीप सतत तेवत असायचे. आजही परदेशातून परतणारे भारतीय व्यापारी आणि देशातील सहस्रो भक्त श्री सोमनाथाला आपल्या नफ्यातून सोने, रूपे, रत्ने अर्पण करत असतात. आत्तापर्यंत हे मंदिर १६ वेळा उद्वस्त झाले व परत बांधले गेले आहे. देवाच्या पूजाभिषेकाला हरिद्वार, प्रयाग, काशी येथील गंगोदक दररोज यायचे. काश्मीरची फुले देवाच्या पूजेला असायची. नित्य नैमित्तिक उपासनेला सहस्र ब्राह्मणांची नेमणूक होती. मंदिराच्या दरबारात नृत्य, गायन यांसाठी सुमारे साडेतीनशे नृत्यांगना होत्या. 
।। ॐ नमः शिवाय ।।  ( courtesy : Shree Swami Samarth Bhakt Parivar  )

No comments:

Post a Comment