Monday 30 July 2012

नखे आणि अहंकार




काल skype वर, श्रुती आपली वाढलेली नखे अगदी अभिमानाने दाखवीत होती. परवा परवा पर्यंत नखे कुरतडणाऱ्या मुलीला ह्याचे कौतुक वाटणे अगदी साहजिकच होते. मला पण तिची वाढलेली नखे पाहून बरे वाटले. तिची नखे कुरतडण्याची सवय सुटली हे बघून मला पण सात्विक आनंद झाला.  नंतर इंग्लिश मध्ये असलेल्या एका सुविचाराची मला आठवण झाली.परवाच फेसबुकवर हेमंतने पोस्ट केलेला हा सुविचार माझ्या नवऱ्याने मला वाचून दाखविला होता. तो असा " When nails grow long, we cut nails not fingers. Similarly, when misunderstandings grow up, cut your ego and not your relations." काय मज्जा आहे बघा, ज्या नखाला, आपल्यात असलेल्या अहंकाराची उपमा दिली आहे आणि आपल्याला उपदेशले आहे कि  आपली बोटे न कापता ही वाढलेली नखे कापणे आवश्यक आहे कारण  जीवनात अहंकारापेक्षा नाती सांभाळणे हे श्रेष्ट आहे , तीच नखे हल्ली सुंदरतेचे लक्षण समजले जाते. ही नखे जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. नेल आर्ट ची  तर मोठी मोठी दुकाने मांडून बायका पैसे कमावत आहेत. एक क्षणी वाटले, ह्या नखे वाढविण्याच्या कलेचा आणि सुविचाराचा काही संबंध आहे कि नाहीं? हल्लीच्या स्पर्धात्मक झालेल्या धावपळीच्या आयुष्यात, माणूस फक्त विषयाच्या मागे धावत आहे. ह्या विषय वासनेने त्याला अगदी आंधळे करून टाकले आहे. अहंकाराच्या भावनेने त्याची सद्विवेक बुद्धी भ्रष्ट होवून गेली आहे का ? त्याची आपलेपणाची भावना कुठे हरवून गेली आहे? का आपल्याला आपली नाती गोती सांभाळण्यापेक्षा नखे गोंजारणे जास्त महत्वाचे वाटते? आधुनिक जगातील प्रगतीने आपल्याला दिलेला हा एक शापच आहे. आणि हा शाप, आपण नखे सुंदररित्या वाढवून छान दिसणाऱ्या हातात पकडून छातीशी कवटाळून बसलो आहोत. ह्या अशा नखांची किमया किती वर्णावी तितकी कमीच !!!!  

No comments:

Post a Comment