Wednesday 18 July 2012

आव्हानं.....


आयुष्यातल्या आव्हानांची गुदगुदी कशी एकदम गर्भाशयापासूनच होते. असे म्हणतात कि, गर्भाशयात सुरवातीला एकापेक्षा जास्त अंडी असतात. त्या "fittest the survivor" च्या प्रवासात बलवान अंडी समोर एकच "आव्हान" असते आणि ते म्हणजे नऊ महिन्याचा तो काळ अतिशय जवाबदारीने ममतेच्या कुशीत आतमध्ये राहून एक दिवशी देवाच्या आज्ञेनुसार ह्या जगात प्रवेश करणे. त्यानंतर आव्हानांची जी काही रांग लागते त्यात वेळ कसा पटकन निघून जातो हे कळतच नाहीं.

जन्माला आल्याबरोब्बर मोठ्याने आवाज काढून रडण्याचे "आव्हान"
रडून दाखवल्याबरोब्बर लगेच आईच्या स्तनातील अमृततुल्य दुध पिवून दाखवण्याचे "आव्हान"
दृष्टीच्या संवेदनाला चालना मिळाल्यावर आईचे सुंदर मुख प्रथम पाहण्याचे "आव्हान"
नंतर हळूहळू सर्वांची ओळख करून घेवून त्यांच्याकडे पाहून उगीचच हसण्याचे "आव्हान"

हात आणि पाय घट्ट झाल्यावर पालकांचा हात धरून ते सांगतील तिथे आणि तसे चालण्याचे "आव्हान"
लुसलुशीत बालपणात शरीराला जास्त दुखापत न करून घेता अक्षराचे ज्ञान करून घेत घेत खेळण्याचे "आव्हान"
शाळेत जावू लागल्यानंतर पालकांच्या  आणि शिक्षकांच्या अपक्षेप्रमाणे अव्वल गुण मिळवण्याचे  "आव्हान"
ही स्पर्धा नाहीतर ते बक्षीस ह्यांच्याशी मैत्री करून आई-वडिलांना त्यांची मान गर्वाने उचलून धरण्यास हातभार लावण्याचे "आव्हान"
"मला तुझ्यासारखी मुलगी असायला हवी होती," असे बळजबरीने का होईना पण असे म्हणण्यास शिक्षकांना भाग पाडण्याचे "आव्हान"
असे करता करता, आईच्या मायाळू मार्गदर्शनाखाली हळूच किशोरावस्थेतून यौवनावास्थेत पदार्पण करण्याचे  "आव्हान"

यौवनावास्थेत कौमार्याला जगातील वाईट आणि दुष्ट शक्तीपासून जपण्याचे "आव्हान"
महाविद्यालात आपण पुढे काय शिकावे आणि काय बनावे ह्याबद्दल दुसऱ्यांची मते सतत ऐकण्याचे "आव्हान"
नौकरीला  लागल्यानंतर बॉसच्या कायम गुड बुक्स मध्ये राहण्याचे "आव्हान"
प्रत्येक महिन्याच्या शेवटी शक्य नसतानाही थोडीतरी शिल्लक बँकेत जमा करण्याचे "आव्हान"
आजूबाजूची आपल्या वयातील मंडळी मजा करतांना पाहुन संभ्रमात पडलेल्या मनाची समजूत घालण्याचे "आव्हान"
आई-वडिलांनी किती छान वळण लावले आहे तुला, असे ऐकल्यावर  लोकांचे हे मत दृढ व्हावे म्हणून सतत तोलामापाने वागण्याचे   "आव्हान"

पंचविशीच्या आत लग्न करून गृहस्थाश्रमात, समाजातल्या रूढीनुसार पदार्पण करण्याचे "आव्हान"
नवराच्या पुढे किंव्हा मागे राहून हसत खेळत संसार करण्याचे "आव्हान"
नातेवाईकांमध्ये प्रेमानी आपलेपणा निर्माण करून त्यांच्याशी जन्मजन्माचे नाते असल्याचा दिलासा देण्याचे "आव्हान"
आत्ममीलनातून उपजलेल्या लेकरांना नुसत्या शब्दांचे ज्ञान न देता सुंदर जीवनातील खाचा खळग्यांचे नकळत परिचय करून देण्याचे "आव्हान"
आपले बोट न धरता स्वतःहून मार्ग आक्रमण करण्यास आतुर असलेल्या आपल्या मुलांची, त्यांच्या दृष्टीआड राहून सतत काळजी करण्याचे  "आव्हान"
त्यांना सदा सुखी ठेव आणि त्यांची सर्व दुखः आम्हाला दे, अशी देवाला विनविण्याची खटपट करत राहण्याचे "आव्हान"
ह्या सर्व प्रक्रियेत, आपल्या पेक्षा बुद्धीने शेरसव्वाशेर जास्त जड झालेल्या मुलांच्या, त्यांच्या पालकांबद्दलाच्या असलेल्या अपेक्षेप्रमाणे वागवून दाखवण्याचे "आव्हान"
"हम भी तुमसे कम नहीं," हे त्यांना सिद्ध करून दाखविण्यासाठी  निरंतर बदलत राहणाऱ्या technology बरोबर  उगीचच अद्यावत राहण्याचे "आव्हान"
मधूनमधून आपल्याला "सुपर कूल आई-वडील" म्हणणाऱ्या कर्तुत्ववान मुलांच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी करायच्या परिश्रमाचे "आव्हान"
आपली स्वतःची आई आपल्या जवळ सतत राहून आपल्यावर तिच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करावा, यासाठी आपल्या भावना तिच्यासमोर नाजुकरीत्या प्रकट  करण्याचे "आव्हान"
पंख फुटलेली पाखरे, आपण ममतेच्या उबेत सांभाळून ठेवलेल्या घरट्यातून एक ना एक दिवस  दुसऱ्या घरट्यात जाणार ह्याची जाणीव झाल्यावर, अश्रू डोळ्यांच्या कडेवर न येऊ देण्याचे "आव्हान"

जीवनात ही  सर्व आव्हाने ख़ुशी-खुशीने पेलवत असताना, अखंडित पणे केलेल्या देवावरच्या प्रेमपूर्वक भक्तीचा  शेवट खरोखरीच्या परमार्थात घडावा यासाठी निरंतर नामस्मरणाची गोडी लागावी म्हणून गुरूंच्या चरणावर शरणागती पत्करण्याचे "आव्हान"......

No comments:

Post a Comment